text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा विषयी विविध प्रश्न आणि उत्तरे

 मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा विषयी विविध प्रश्न आणि उत्तरे

१. महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम काय आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी देतो. फेलोंच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची प्रशासनास मदत होते. फेलोंचा उत्साह व तंत्रज्ञानाची समज यामुळे प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान व अनुभव यामुळे तरुण फेलोंचा दृष्टिकोन विस्तारतो.

२. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. २०२० पर्यंत सदर कार्यक्रम राबविला गेला. मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये हा कार्यक्रम पुनश्च सुरु केला आहे.

३. मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ चा कालावधी किती आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ चा कालावधी १२ महिन्यांचा आहे.

४. मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ साठी मी कधी अर्ज करू शकते / शकतो?
मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ साठी अर्जाची प्रक्रिया ०७/०२/२०२३ रोजी सुरु होत असून अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०२/०३/२०२३ असेल.

५. मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ साठी अर्जाचे शुल्क किती आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप, २०२३ साठी अर्जाचे शुल्क रु. ५०० एवढे आहे

६. निवड प्रक्रिया किती स्तरांवर पार पडते?
निवड प्रक्रिया २ स्तरांवर पार पडते. प्रथम स्तरावर सर्व अर्जदारांना वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. या ऑनलाईन परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणारे २१० उमेदवार दुसऱ्या स्तरावरील निवडीस पात्र ठरतात. या उमेदवारांना दिलेल्या ३ विषयांवर निबंध सादर करावे लागतात. अंतिम निवडीसाठी निबंध सादर केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. अंतिमतः योग्यतेच्या आधारे ६० उमेदवारांची फेलो म्हणून निवड होते. ऑनलाईन परीक्षेतील विषय तसेच अंतिम निवड करताना ऑनलाईन परीक्षा, निबंध व मुलाखत यांना असलेले भारांकन या बाबतचा तपशील या संकेतस्थळावरील ‘निवड प्रक्रिया’ या टॅब अंतर्गत देण्यात आलेला आहे.

७. अर्ज करताना प्रमाणपत्र व इतर कागदपात्रांच्या मूळ प्रतींची आवश्यकता असते का?
अर्ज करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र व इतर कागदपात्रांच्या मूळ प्रतींची आवश्यकता नसते. या कागदपत्रांमधील माहिती अर्ज करताना भरावयाची असते. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे मुलाखतीच्या दिवशी तपासली जातात. मूळ कागदपत्रे व दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद केले जाऊ शकते वा त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते.

८. फेलो म्हणून मी माझ्या कामाचा अहवाल कोणाला सादर करेन?
फेलो थेट वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतील. हे अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतील. या अधिकाऱ्यांसोबत फेलोंचा वारंवार संवाद होईल, फेलोज त्यांना आपल्या कामाबद्दल अवगत करतील. फेलोंना आपला मासिक अहवाल संबंधित अधिकारी तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयास सादर करावा लागेल. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय दर ३ महिन्यांनी फेलोंच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वर्षातून दोन वेळा फेलोंच्या कामकाजाचा आढावा घेतील.

९. फेलोंच्या कामाचे स्वरूप कसे असते?
प्रत्येक फेलोच्या कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यांच्या प्लेसमेंट नुसार व ते ज्या कार्यालयासोबत किंवा अधिकाऱ्यासोबत काम करतात त्या प्रमाणे त्यात बदल होतो. एखाद्या चालू असलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत मदत करणे, एखाद्या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी, प्रकल्पाचे संनियंत्रण, शासकीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा किंवा धोरण निर्मिती अशा विविध स्वरूपाचे काम फेलोज करतात. कामाच्या स्वरूपानुसार फेलोशिपच्या संपूर्ण कार्यकाळात फेलो एका प्रकल्पावर किंवा एका पेक्षा अधिक कार्यक्रमांवर काम करू शकतो. यापूर्वी विविध प्राधिकरणांसोबत काम करणाऱ्या फेलोंनी एकत्र येऊन आपल्या नियमित कामकाजा व्यातिरिक्त नाविन्यपूर्ण प्रकल्प व धोरणात्मक प्रस्ताव शासनास सादर केले होते.

१०. फेलोंमध्ये विशिष्ट शाखेचे शिक्षण, कौशल्ये किंवा इतर गुण यांना प्राधान्य दिले जाते का?
कोणत्याही शाखेचा प्रथम वर्ग पदवीधर फेलो म्हणून काम करू शकतो. आत्मविश्वास, नेतृत्त्व गुण, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक कौशल्य, संवाद कौशल्य आणि विविध घटकांसोबत काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये फेलोंकडे असणे अपेक्षित आहे. निवडीचे निकष वगळता इतर निकषांचा (जसे लिंग, लैंगिकता, वैवाहिक स्थिती, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी, व्यवसाय, अपंगत्व, ग्रामीण पार्श्वभूमी) फेलोंच्या निवडीवर कोणताही परिणाम होत नाही.

११. फेलोंसाठी प्रशिक्षणाची तरतूद आहे का?
या वर्षी आपण आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांचे सोबत फेलोशिप कार्यक्रम राबवित आहोत. या दोन्ही संस्था प्रत्येकी ५०% फेलोंना प्रभावी धोरण निर्मितीसाठी आवश्यक साधने व पद्धती यांचे प्रशिक्षण देतील. प्रत्यक्ष कॅम्पस वर व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जाईल. फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सर्व फेलोंना या प्रशिक्षण कार्यक्रमांना हजर राहणे व ते यशस्वीरित्या पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांचा तपशील योग्य वेळी दिला जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमाशिवाय, महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत संवाद व विविध संस्थांना भेटींचे आयोजन केले जाते. या संवाद व भेटींच्या माध्यमातून फेलोंना खूप काही शिकता येते. फेलोंना प्रत्यक्ष प्लेसमेंटच्या ठिकाणी करावयाच्या कामासाठी प्रशिक्षण दिले जात नाही. याचे कारण म्हणजे, प्रत्येक फेलोचे प्लेसमेंट नुसार बदलणारे कामाचे स्वरूप. संबंधित प्राधिकरणाची गरज व फेलोची कौशल्ये यावर कामाचे स्वरूप ठरते. फेलोंनी काम करताकरता शिकणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतात.

१२. फेलोंना भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होतात?
शासनासारख्या महत्त्वाच्या व विशाल यंत्रणेसोबत काम करण्याचा अनुभव हा अत्यंत दुर्मिळ व एकमेवाद्वितीय असा असतो. फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून फेलोंमध्ये विविध कौशल्ये वाढीस लागतात. यामध्ये व्यवस्थापन कौशल्ये, संवाद कौशल्ये, साधन संपन्नता, प्रश्न सोडविण्याचे कसब यांचा समावेश होतो. या अनुभवातून फेलोंना शैक्षणिक व करिअर संबंधातील अनेक संधी उपलब्ध होतात. प्रशासकीय सेवा, सार्वजनिक धोरण, धोरण निर्मिती, व्यवस्थापन, कन्सल्टन्सी, सामाजिक क्षेत्र हे करिअरचे काही पर्याय आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks